Ad will apear here
Next
यशस्वी चित्रपटांचे निकष
गेल्या ८० वर्षांतील निवडक १०० मराठी चित्रपटांच्या अभ्यासाचा निष्कर्ष
संत तुकाराम

‘पटकथा लेखनाचा अभ्यास करताना मी गेल्या ८० वर्षांतल्या गाजलेल्या आणि मी पाहिलेल्या सुमारे १०० चित्रपटांची यादी केली. प्रत्येक चित्रपट कोणत्या ‘गुणां’मुळे गाजला, त्याचा विचार केला. त्यावरून ‘यशाचं नेमकं गमक काय?’ हे शोधण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही गणिती सूत्रानं यशस्वी चित्रपटाची निर्मिती करता येत नाही, हे खरं; परंतु, यशस्वी चित्रपटांतली पकड घेणारी वैशिष्ट्यं लक्षात घेतली, तर त्याचा उपयोग निश्चितच होण्यासारखा आहे...’ ज्येष्ठ मराठी लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर ‘किमया’ सदरात आज लिहीत आहेत मराठी चित्रपटांच्या यशस्वितेबद्दल स्वतःच्या अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षांबद्दल...
...........
भरपूर चित्रपट बघणं हे माझं व्यसन आहे. ते सुटण्यासाठी काहीही औषध नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा व अन्य जागतिक भाषा - जेवढे जमतील तेवढे बघत राहणं. खरं म्हणजे त्याच क्षेत्रात काम करण्याची तीव्र इच्छा होती-आहे; मात्र साहित्य-क्षेत्रात आजवर गुंतून राहिलो. अर्थात तोही प्रवास आनंदाचाच ठरला.

थिएटरमध्ये दर शुक्रवारी चित्रपट बदलतात. संपूर्ण देशभर वर्षानुवर्षं तो संकेत पाळला जातो. दिवाळी, ईद हे अपवाद क्वचित. त्या त्या आठवड्यात कोणते चित्रपट, कोणत्या थिएटर्समध्ये, कोणत्या वेळी बघता येतील. याची नोंद केलेला नवा कागद माझ्या खिशात असतो. कधीही येऊन बघा. बघितलेल्या चित्रपटांवर फेसबुकवर (शक्यतो) माझा अभिप्राय देतो. तिथे पाच हजार मित्र असल्यामुळे, माझ्या अभिप्रायावर विसंबून बरेच जण ते चित्रपट बघतात. विनामूल्य सेवा! निर्माता-दिग्दर्शकांनी इकडे लक्ष द्यावं आणि वृद्ध लेखकाला पेन्शन सुरू करावं!

सांगत्ये ऐका...

असो. आवडीचा विषय म्हणून अलीकडेच पटकथा लेखनाचा एक छोटा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षक अनुभवी होते. छान माहिती मिळाली. चांगले चित्रपट काढावेत, अशी निर्मात्यांची आणि निघावेत अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते. मोठं अवाढव्य जग आहे ते. जगभरातलं प्रभावी माध्यम! म्हणून, त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. काही चित्रपट कमालीचे यशस्वी ठरतात, तर काही बॉक्स ऑफिसवर आपटतात. हमखास यशाची सूत्रं कोणीच सांगू शकत नाही; तथापि चित्रपट चांगला चालावा, विक्रमी उत्पन्न मिळावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी भरपूर कष्ट घेतले जातात. सर्वांगीण विचार केला जातो. अमाप यश मिळवणाऱ्या कलाकृतींच्या पटकथांचं ४०-५० वेळा पुनर्लेखन केलेलं असतं. करोडो रुपयांचा अभ्यासपूर्ण ‘जुगार’ असतो तो. गांभीर्यानं निर्मिती करणारे लोक इथे गृहीत आहेत.

जगाच्या पाठीवर

माझ्या लहानपणी अनेक उत्तम चित्रपटांचे रौप्यमहोत्सव होत असत. १०० आठवडे पूर्ण केलेले चित्रपटसुद्धा आहेत. मराठीतील ‘संत तुकाराम’ आणि ‘सांगत्ये ऐका’ हे त्यातले प्रमुख. रौप्यमहोत्सव म्हणजे एका आठवड्यात २१ खेळ, असे २५ आठवडे. म्हणजे एका थिएटरमध्ये ५२५ खेळ. आता प्रदर्शनाचं तंत्र पूर्ण बदललं आहे. चित्रपटाच्या ‘प्रिंट्‌स’ काढाव्या लागत नाहीत. सॅटेलाइटवरून ‘यूएफओ’ कंपनीमार्फत, एकाच वेळी देशभर हजारो थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. त्याचा खर्च ‘प्रिंट’च्या मानानं खूपच कमी असतो. सांगण्याचा मुद्दा असा, की एक चित्रपट समजा एकाच वेळी ५०० ठिकाणी प्रदर्शित झाला आणि दिवसाला एकच खेळ झाला असं धरलं, तरी दिवसाचे ५०० खेळ होतात. याचा अर्थ एकाच दिवसात त्या चित्रपटाचा रौप्यमहोत्सव झाला! निर्मितीवर प्रचंड खर्च होत असतो. तो जितक्या वेगानं भरून निघेल, तितका फायदेशीर. म्हणून पहिल्याच दिवशी बहुतेक चित्रपटांचं भवितव्य स्पष्ट होतं.

पटकथा लेखनाचा अभ्यास करताना अनेक प्रकारचा सराव झाला. त्यात, मी स्वत: निवडलेला एक विषय म्हणजे ‘गेल्या ८० वर्षांतले गाजलेले मराठी चित्रपट.’ त्यासाठी प्रथम सुमारे १०० चित्रपटांची यादी केली. ती सर्व नावं इथे देत नाही; परंतु प्रत्येक चित्रपट कोणत्या ‘गुणां’मुळे गाजला, त्याचा विचार केला. त्यावरून ‘यशाचं नेमकं गमक काय?’ हे शोधण्याचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे हे सर्व चित्रपट मी पाहिलेले आहेत. कोणत्याही गणिती सूत्रानं यशस्वी चित्रपटाची निर्मिती करता येत नाही, हे खरं; परंतु, यशस्वी चित्रपटांतली पकड घेणारी वैशिष्ट्यं लक्षात घेतली, तर त्याचा उपयोग निश्चितच होण्यासारखा आहे. काही प्रसिद्ध उदाहरणं आपल्याला ठाऊक आहेत. भगवानदादाचा ‘अलबेला’ आणि ‘शोले’ हे चित्रपट सुरुवातीला चालत नव्हते. पुढे त्यांनी इतिहास घडवला. कमी खर्चात बनवलेल्या ‘जय संतोषी माता’ला कित्येक दिवस कोणी वितरक मिळेना. पुढे एकदाचा मिळाला आणि त्याचं उखळ पांढरं झालं. संपूर्ण देशभर तो इतका चालला, की अनेक ठिकाणी त्याचे रौप्यमहोत्सव झाले; आणि संतोषी मातेला लाखो भक्त मिळाले. देवांनासुद्धा पडता आणि ऊर्जितावस्थेचा काळ असतो!

‘प्रभात स्टुडिओ’च्या संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, कुंकू, माणूस यांपासून ते पुढे लाखाची गोष्ट, अमर भूपाळी, पेडगावचे शहाणे आदी जुने चित्रपट; नंतर जगाच्या पाठीवर, सुवासिनी, मानिनी, पाठलाग, माहेरची साडी असे मधल्या काळातले अनेक आणि नंतरचे सामना, उंबरठा, जैत रे जैत, श्वा स, डोंबिवली फास्ट, नटरंग यांपासून नटसम्राट, कट्यार, अस्तु, अनुमती हे सगळे चित्रपट अभ्यासासाठी घेतले. ही सर्व नावं प्रातिनिधिक आहेत. मूळ यादी मोठी आहे. नंतर प्रत्येक चित्रपटाची महत्त्वाची वैशिष्ट्यं लिहून काढली. त्यावरून ते ते वैशिष्ट्य किती चित्रपटांमध्ये दिसून येतं, त्याचा वेगळा विभाग तयार केला. ते विषय असे - संगीत/पार्श्वसंगीत, नाट्यमयता, धार्मिक/संतमहंत, प्रेम, इतिहास, बदला/पैज/अन्याय, बालकथा, तमाशा, भडकपणा, कौटुंबिक, विनोद, राजकारण, दिग्दर्शन/अभिनय, ग्रामीण/सामाजिक/महिलांविषयक प्रश्न, राष्ट्रभक्ती/क्रांती, विद्यार्थी/शिक्षण, साहस, सत्यकथा/वास्तव.

हे सर्वसाधारण विषय झाले. आता या विषयांमधील काही विभागांतर्गत कोणते चित्रपट येतात ते पाहू.

संगीत : संत तुकाराम, अमर भूपाळी, लाखाची गोष्ट, गुळाचा गणपती, देवबाप्पा, अवघाचि संसार, उंबरठा, सुवासिनी, जैत रे जैत, नटरंग, कट्यार इत्यादी.

नाट्य : रामशास्त्री, पेडगावचे शहाणे, सांगत्ये ऐका, सामना, पिंजरा, इत्यादी

तमाशा : जय मल्हार, सांगत्ये ऐका, भाऊबीज, पिंजरा, नटरंग.

सामाजिक व अन्य प्रश्न : शेजारी, उंबरठा, अनुमती, फँड्री, सैराट, सातच्या आत घरात, नॉट ओन्ली मिसेस राऊत, गाभ्रीचा पाऊस.

विनोदी : ब्रह्मचारी, गुळाचा गणपती, सोंगाड्या, धूमधडाका, अशी ही बनवावनबी, दोन्ही घरचा पाहुणा, एक डाव धोबीपछाड.

याचा निष्कर्ष काढताना असं लक्षात येतं, की १००मधले ३० चित्रपट संगीतामुळे चालले. त्याच्या खालोखाल, निरनिराळ्या प्रकारचं नाट्य असलेले २० चित्रपट आहेत. सामाजिक प्रश्न, कौटुंबिक आणि विनोदी सदरात येणारे चित्रपट त्याच्या खालोखाल येतात. एकाच चित्रपटात आवडणारे जास्त विषय असू शकतात; परंतु संगीत हा सर्वांचा आत्मा आहे. केवळ संगीतामुळे प्रचंड यश मिळवणारे अनेक चित्रपट आहेत. मराठीत गाणी नसलेल्या चित्रपटांचं प्रमाण अत्यंत अल्प आहे.

चित्रपटातलं नाट्य प्रभावी असल्यास प्रेक्षकांना ते पसंत पडतं. उत्तम कथा-पटकथा, अभिनय, दिग्दर्शन, तांत्रिक बाजू चांगली या गृहीत धरलेल्या गोष्टी आहेत. निर्मितीच्या सर्वच बाबतींत भारतीय चित्रपट हॉलिवूडच्या तोडीस तोड आहेत. तथापि, इंग्रजीमधल्या वाङ्‌मयाप्रमाणेच, इंग्रजी चित्रपटांत विविध प्रकारचे विषय हाताळले जातात. हिंदी चित्रपट तिथे कमी पडतात - मराठी त्याच्याही खालोखाल आहे. निर्मितीमधली गुंतवणूक हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे. हिंदी-मराठीत त्याच त्याच कलाकारांचे चेहरे बघावे लागतात, ही एक वस्तुस्थिती आहे. आता त्यात बदल होत चालला आहे. दूरदर्शनवरच्या अनेक वाहिन्यांमुळे नवनव्या कलाकारांना वाढत्या प्रमाणात संधी मिळत आहे. इंग्रजी चित्र-विश्वा त्या बाबतीत सुरुवातीपासूनच (सुमारे १०० वर्षं) समृद्ध आहे.

अशा रीतीनं उत्तम नाट्य-संगीत (किंवा संगीत-नाट्य) हे यशस्वी चित्रपटाचं सूत्र आहे. नाट्य-विषय हे स्थल-काल-परिस्थितीनुसार बदलत गेलेले आहेत. त्याचा ऊहापोह स्वतंत्रपणे करता येईल. संगीताचा विचार केला, तर सुरुवातीपासून आजपर्यंत अभिजात - रागदारीवर आधारित- संगीत हेच लोकप्रिय ठरत आलेलं आहे. ‘ऱ्हिदम’वरील वेगवान ताल आणि ठेका, गाणी लोकांना आवडतात; पण त्यांचं आयुष्य, अपवाद वगळता कमी असतं. हे निष्कर्ष वरवर पाहता अगदीच  साधे किंवा ‘त्यात काय विशेष’ असे वाटतील; पण ते १०० चित्रपटांचा आढावा घेऊन काढलेले आहेत.

आपले निर्माते-दिग्दर्शक असा अभ्यास करत असतीलच. तथापि, त्याबाबत माझा एक जुना आवडता सिद्धांत आहे. निर्मितीमध्ये भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या गुंतलेलं असताना काही वेळा साध्या साध्या गोष्टी (चुका) लक्षात येत नाहीत. त्रयस्थपणे विचार करणारे दिग्दर्शकच निर्दोष चित्रपट काढू शकतात.

या सगळ्याचा उपयोग करून एखादी तरी चांगली कथा-पटकथा लिहावी, हीच (अंतिम नव्हे) इच्छा आहे.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZPOBS
 Your observations may be right but society has drastically changing thereby likings . Best wishes for your story writing but do not relay on your past conclusions . Why movies like Albela or Sholay we’re not hits initially
Similar Posts
यशस्वी चित्रपटांचे निकष ‘पटकथा लेखनाचा अभ्यास करताना मी गेल्या ८० वर्षांतल्या गाजलेल्या आणि मी पाहिलेल्या सुमारे १०० चित्रपटांची यादी केली. प्रत्येक चित्रपट कोणत्या ‘गुणां’मुळे गाजला, त्याचा विचार केला. त्यावरून ‘यशाचं नेमकं गमक काय?’ हे शोधण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही गणिती सूत्रानं यशस्वी चित्रपटाची निर्मिती करता येत नाही,
‘सांगत्ये ऐका’च्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने... काही चित्रपट आपल्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. ते कितीही वेळा पाहिले, तरी नव्यानं आनंद देतात. मराठीतला असाच एक विलक्षण लोकप्रिय, १३० आठवडे सलग एकाच ठिकाणी चालण्याचा उच्चांक निर्माण करणारा चित्रपट म्हणजे ‘सांगत्ये ऐका’. १९५९मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं ६१ वर्षं पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने,
पुण्यातील जुनी चित्रपटगृहे नुसत्या आठवणींनी गतकाळात नेणाऱ्या पुण्यातील जुन्या चित्रपटगृहांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
माझं घर ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत, लहानपणापासून आजतागायत त्यांचं ज्या-ज्या ठिकाणी वास्तव्य झालं, त्या घरांबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language